सामाजिक उपक्रम

१) मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी, औषध वाटप व रक्तदान शिबिर :-

संस्थेमार्फत गावोगावी जाऊन जनहित शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिरांमध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. विशाल मेंगडे, नेत्र चिकित्सक डॉ. श्री. निलेश मते, महिला चिकित्सक डॉ. सुवर्णा मेंगडे, होमिओपॅथिक तज्ञ डॉ. स्वाती असबे व अक्षय ब्लड बँक, यांच्यामार्फत मोफत सेवा दिली जाते. ज्या खेडेगावामध्ये सोयी सुविधा नाहीत, सरकारी दवाखाना जवळ नसल्याने लोकं तिथे जाऊ शकत नाहीत अशा गावामध्ये लोकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष असते, खाजगी दवाखान्यात पैशाच्या अभावाने अशा लोकांची फसवणूक केली जाते. हे होऊ नये म्हणून संस्था अशा भागात जाऊन मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषध वाटप व योग्य वैदयकीय सल्ला या सेवा देण्याचे कार्य प्रामाणिकपणे करते. गावातील वयस्कर लोकांमध्ये 'मोतीबिंदू' मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने तसेच लहान मुलांना डोळ्यांचे आजार आढळून येत असल्याने संस्थेमार्फत योग्य पद्धतीने मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मेवाटप या सेवाही दिल्या जातात. महिलांसाठी योग्य तपासणी व सेवा महिला तज्ञ डॉक्टर यांच्याकडून दिली जाते व योग्य मार्गदर्शन केले जाते. 'रक्तदान हेच श्रेष्ठ दान' लक्षात घेऊन मोफत रक्तदान शिबिर आयोजित करून मोठ्या प्रमाणावर रक्तदानाची सेवा संस्थेमार्फत राबवली जाते. अशाप्रकारे समाजातल्या लोकांना योग्य ती वैद्यकीय सेवा त्यांच्यातही परमेश्वर आहे हे ओळखून त्यांची सेवा करण्याची संधी संस्थेमार्फत दिली जाते.


मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी, औषध वाटप व रक्तदान शिबिर

२) वृक्षारोपण व ग्रामस्वच्छता अभियान :-

निसर्ग हा साक्षात परमेश्वर आहे कारण त्याच्यामुळेच आपण सुखदायी, आरोग्यदायी जीवन जगू शकतो. पण वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाचा आज ऱ्हास होत चालला आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड ही पर्यावरणासाठी घातक आहे हे लक्षात घेऊन वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. ज्याप्रकारे एखाद्या लहान मुलाच संगोपन करून त्याला वाढवले जाते त्याप्रकारे फक्त वृक्षारोपण न करता त्यांचे योग्य पद्धतीने संवर्धन करून त्यांनाही वाढवायला हवं कारण भविष्यात हेच वृक्ष मोठे होऊन आपल्याला फळे, फुले, सावली, शुदध हवा, ऑक्सिजन अशा अनेक जीवनावश्यक व आरोग्यदायी गोष्टी देतात. हे लक्षात घेऊन आपण निसर्गाचे देणे लागतो हे आपले कर्तव्य समजून संस्थेमार्फत जनहित शिबिर सारख्या अनेक उपक्रमांमधुन मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते आणि त्यांचे योग्य पद्धतीने संवर्धनही केले जाते. यामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी औदुंबर, वड, पिंपळ, आंबा, जांभूळ, सोनचाफा व गुलमोहर यासारख्या दाट सावली देणाऱ्या झाडांचा समावेश असतो. वृक्षसंवर्धनासोबतच ग्रामस्वच्छता हा विषय देखील तितकाच महत्वाचा आहे हे लक्षात घेऊन आपली संस्था गावो - गावी 'ग्रामस्वच्छता अभियान' राबवते, त्यातून लोकांना स्वच्छतेविषयी योग्य मार्गदर्शन दिले जाते. आपण जर स्वच्छता आपल्या स्वतःच्या घरापासून केली तर गावात कोणताही आजार पसरणार नाही, निरोगी जीवन जगता येईल याची आवश्यक माहिती संस्थेमार्फत लोकांना सांगितली जाते आणि गावातील तरूण पिढीला सोबत घेऊन त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून संस्थेतील सेवेकरी ग्रामस्वच्छता अभियान राबवून त्यामध्ये स्वतः सहभागी होतात.


वृक्षारोपण

ग्राम स्वच्छता

३) महिलांच्या सबलीकरणासाठी व्याख्यान, प्रबोधन तसेच कायदेविषयक मोफत सल्ला व मार्गदर्शन:-

"यत्र नार्यस्तू पूजन्ते रमन्ते तत्र देवता" - जिथे स्त्रियांना योग्य मान दिला जातो तिथे देवतांचा अधिवास असतो असं आपली भारतीय संस्कृती अभिमानाने सांगते. पण तरीसुद्धा आजही अनेक ठिकाणी खेडेगावामध्ये महिला जुन्या चालीरीती, परंपरा याखाली चिरडल्या जातात. आजही समाजात महिलांना उनेक त्रास भोगावे लागतात. बलात्कार, स्त्रीभ्रूण हत्या यासारख्या अनेक अत्याचारांना महिला बळी पडतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, महिलांनी सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात ताठ मानेने उभं राहिल पाहिजे, आपल्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराचा प्रतिकार केला पाहिजे म्हणून संस्था महिला सबलीकरणासाठी सुद्धा कार्य करत आहे. घरातील स्त्री एक मार्गदर्शक असते, ती दिशा देणारी असते, चुकलेल्यांना मार्ग दाखविणारी असते अशाप्रकारचं प्रबोधन संस्थेतील महिला सेवेकरी जनहित शिबिरअंतर्गत गावातील महिलांना करत असतात, त्यांनाही समाजात योग्य स्थान मिळावं यासाठी योग्य मार्गदर्शन करत असतात. इतकच नव्हे तर महिलांना स्वतःवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात लढता यावं यासाठी संस्थेतील महिला वकिलांच्या मदतीने महिलांना मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन दिले जाते. अशाप्रकारे महिलांना सक्षम करण्यासाठी सुद्धा संस्था नेहमी कार्यरत आहे.


४) गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व मार्गदर्शन:-

"अरे वा !!! पुन्हा नवीन वर्ष !! पुन्हा नवीन वह्या, नवीन कपडे व पुस्तके!!" हे सर्व दिवस आपण बरेचजण अनुभवतो, पण आजही अशी अनेक गावं आहेत, असे अनेक विद्यार्थी आहेत जे या गोष्टींपासून वंचित आहेत. फक्त घरातील गरीब परिस्थिती या मुलांना शिक्षणाच्या आनंदापासून लांब ठेवते. पण अशा मुलांच्या मनात मात्र शिक्षणाची खूप मोठी ओढ व जिद्द असते. अशा या गरीब व गरजू मूलांच्या जिददीला सलाम करत आपली संस्था जनहित शिबिरांमध्ये गावातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप आणि शैक्षणिक मदत व मार्गदर्शन करत असते. त्या मुलांना हे साहित्य वाटप करून मोठं कार्य होतं असं अजिबात नाही पण त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत हातभार लावण्याचा छोटासा प्रयत्न संस्थेमार्फत वेळोवेळी केला जातो. ही मुले उद्या आपल्या देशाचं भविष्य आहेत हे लक्षात घेऊन त्यांना योग्य शैक्षणिक मार्गदर्शन संस्थापक प.पू. गुरुमाऊली श्री. विजय इंगवले महाराज यांच्यामार्फत दिले जात आहे व त्या मुलांना सक्षम करण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला जात आहे.


शालेय साहित्य वाटप

४) रक्तदान शिबीर :-

'रक्तदान हेच श्रेष्ठ दान' लक्षात घेऊन मोफत रक्तदान शिबिर आयोजित करून मोठ्या प्रमाणावर रक्तदानाची सेवा संस्थेमार्फत राबवली जाते. अशाप्रकारे समाजातल्या लोकांना योग्य ती वैद्यकीय सेवा त्यांच्यातही परमेश्वर आहे हे ओळखून त्यांची सेवा करण्याची संधी संस्थेमार्फत दिली जाते.


४) कायदा समुपदेशन :-

महिलांना स्वतःवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात लढता यावं यासाठी संस्थेतील महिला वकिलांच्या मदतीने महिलांना मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन दिले जाते. अशाप्रकारे महिलांना सक्षम करण्यासाठी सुद्धा संस्था नेहमी कार्यरत आहे.