गेली तेरा वर्षे दरवर्षी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मग स्वामी समर्थ महाराज यांचा जयंती उत्सव साजरा का करायचा, तर श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नामाचा प्रचार-प्रसार व्हावा, स्वामी महाराजांचा शुद्ध भक्तिमार्ग लोकांना समजावा हाच मूळ उद्देश घेऊन उत्सव साजरा केला जातो. स्वामी महाराजांचे चरित्र आपल्याला अध्यात्मिक ज्ञानासोबतच भौतिक जीवन सुद्धा कसे जगावे हे शिकवते.
यदायदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत ।
अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम ।
पवित्राणायच साधूनाम् विनाशायच दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।
जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येते तेव्हा तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी भक्तांचा उद्धार करण्यासाठी साक्षात परमेश्वर पृथ्वीवर प्रकट होत असतो हे आपल्याला गीता सांगते. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने जगाचे पालन-पोषण करणाऱ्या ब्रम्हांडनायकाचे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात येणे झाले आहे. जगाचा चालक हा एकच आहे, तोच मूळ स्वरूप आहे आणि हेच मूळ स्वरूप म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. श्री गुरुदत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी, श्री नृसिंह सरस्वती स्वामी व श्री स्वामी समर्थ महाराज हे श्रीगुरू दत्तात्रयांचे चार अवतार आहेत. श्रीनृसिंह सरस्वती स्वामींनी नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर येथे भक्तजनतारणार्थ कार्य करून ते कर्दळीवनात गुप्त अवस्थेत राहिले. तेथे समाधी अवस्थेत असताना त्यांची दिव्य मूर्ती वारुळाने झाकली गेली. त्यानंतर जवळपास तीनशे वर्षांनी एका लाकूडतोड्याचा कुऱ्हाडीचा घाव त्या वारूळामध्ये स्वामींच्या उजव्या मांडीवर बसला. तो व्रण स्वामींच्या मांडीवर कायमचा उमटला. श्री स्वामी समर्थ महाराज कर्दळीवनातून निघून कलकत्ता, बंगाल, हरिद्वार, बद्रीकेदारेश्वर, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, हैदराबाद असे भक्तजनतारणार्थ खूप फिरले. त्यानंतर ते मंगळवेढ्यात आले. श्री स्वामी समर्थ मंगळवेढ्यात जवळपास बारा वर्षे राहिले. नंतर मोहोळ सोलापूर मार्गे सन १८५६ ला अक्कलकोटला आले. थोर स्वामीभक्त चोळप्पा महाराज यांच्या घरी राहून स्वामींनी असंख्य लीला केल्या आणि भक्तांना शुद्ध भक्तीमार्गावर आणले. चैत्र शुद्ध २ सन १८७१ ला स्वामीसुतांनी अक्कलकोट येथे स्वामींचा पहिला जयंती उत्सव साजरा साजरा केला आणि तिथूनच स्वामींच्या भक्तीमार्गाला खरी सुरुवात झाली. मग आताच्या युगात स्वामींचीच भक्ती का करायची, तर या कलियुगात भक्तांना शुद्ध भक्ती मार्गावर आणण्यासाठी स्वामी महाराजांनी अनेक लीला केल्या व त्यातून भक्तांना सेवेत आणले. त्यांनी आपल्या चरित्रातून अनेक लीला करत भक्तांना, समाजाला जगण्यासाठी बऱ्याच गोष्टी शिकवल्या. कोणतही कर्मकांड न करता, उपास-तापास न करता, शुद्ध भक्तीचा, सेवेचा एक थेंब जरी स्वामींच्या चरणी मनोभावे अर्पण केला तर स्वामी आपल्या भक्तांवर अमृताचा वर्षाव करतात. आपल्या आयुष्यात येणारी अनेक संकटे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून अंगावर झेलायला शिकलं की स्वामी आपल्या भक्तांचे सोनं करून दाखवतात. स्वामी जात-पात मानत नाहीत ते कोणत्याही जातीच्या भक्ताचे अन्न खातात, भक्तांची अनेकपरीने परीक्षा घेतात, लोभाने भक्ती केल्यास शासनही करतात पण हळव्या, प्रेमळ, शुद्ध मनाने, भक्तीने साद दिल्यास कायमचे जवळ करतात. स्वामींच्या उपदेशातून, कृतीतून शिकत उच्च कोटीची भक्ती कशी करावी हे आपल्याला स्वामी चरित्र शिकवते. फार सोवळे न पाळता, भोळी भक्ती करावी. स्वामींना ती जास्त प्रिय आहे. ज्ञानाचा, बुद्धीचा, पैशाचा, संपत्तीचा, मानाचा, सेवेचा कसलाही अगदी कसलाही गर्व स्वामींसमोर करू नये. आपला श्वास सुद्धा त्यांच्याच मर्जीने चालतो ते ब्रह्मांडनायक आहेत याच सदैव स्मरण ठेवून लीन राहून भक्ती करावी. अशा अनेक गोष्टी ज्या कलियुगात, या विज्ञानयुगात भक्तांना सहज सोप्या पद्धतीने शिकता येतील, ज्यातून भक्तांचा उद्धार होईल अशा अनेक लीला स्वामींनी करून दाखविल्या आणि आजही त्याची प्रचिती ते भक्तांना वेळोवेळी देत असतात. स्वामी महाराजांनी देह ठेवताना गीतेतील श्लोक पंचवीस वेळा म्हणला,
अनन्याश्चिंतयंतो मां ये जन: पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।।
यातून स्वामींनी भक्तांना खूप मोठा संदेश दिला की अनन्यभावनेने स्वामींना शरण जाऊन स्वामीनामात राहून आपण आपला अध्यात्मिक पाया जर मजबूत ठेवला तर कोणत्याही संकटास भिण्याची गरज नाही, त्यांच्या कृपेने आपलं योगक्षेम साक्षात स्वामीमाऊलीच चालवतात. बहुधान्य नाम संवत्सरी चैत्र कृ. त्रयोयुक्त चतुर्दशीस सन १८७१ ला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज समाधिस्थ झाले. हम गया नही जिंदा है, हे वाक्य देह ठेवताना स्वामींच्या मुखातून बाहेर आले. त्याची प्रचिती आजही भक्तांना ते देत आहेत. आजही ते आपल्या संकटांना धावून येतात, आपलं रक्षण करतात, भक्तांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे नि:शंक आणि निर्भय होऊन फक्त शुद्ध स्वामी सेवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, स्वामीनामाचा प्रचार-प्रसार होण्यासाठी, त्यांचे चरित्र भक्तांना समजण्यासाठी, त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती भक्तांना येण्यासाठी नाम-ध्यान-स्मरण-सेवा मार्गाचा वसा घेऊन स्वामी समर्थ महाराजांचा जयंती उत्सव गेली अनेक वर्षे साजरा केला जातो. स्वामीसेवा, स्वामीभजन, कीर्तन, प्रवचन, अन्नदान सेवा, भव्य पालखी सोहळा अशा अनेक गोष्टींचा त्यामध्ये समावेश असतो. अनेक ठिकाणाहून भक्त मंडळी या उत्सवासाठी येत असतात.
ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम्। मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोःकृपा॥
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. भगवंतापेक्षा गुरूंना अध्यात्मामध्ये खूप मोठे स्थान आहे. अशा या गुरूंचे महत्त्व, गुरुकृपेची ख्याती लोकांना माहीत व्हावी, गुरु-शिष्य नात्यातील प्रेम लोकांना समजावं म्हणून दादा महाराज फौंडेशन, सातारा यांच्या माध्यमातून दरवर्षी गुरुपौर्णिमेला गुरु-शिष्य दिव्यप्रिती संगम सोहळा मोठ्या उत्साहात एकत्र येऊन साजरा केला जातो. या दिवशी गुरुपूजन करण्याला खूप महत्त्व आहे. खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. गुरूंच्या कृपेने आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो -
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥ प्रभू श्रीराम साक्षात भगवान असूनही त्यांनी अनेक गुरु केले, हनुमानजींनी प्रभू रामाला गुरुस्थानी मानत भक्ती कशी असावी याचा आदर्श निर्माण केला, तसेच भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी खूप आहे, परंतु घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही, अगदी त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. गुरुंची प्राप्ती झाल्यानंतर ‘गुरुसेवा’ करणे हे शिष्याचे परमकर्तव्य आहे. गुरुसेवा म्हणजे त्यांची आज्ञा पाळणे. मनात कोणताही किंतू न ठेवता, विकल्प येऊ न देता त्यांनी सांगितलेली साधना नित्यनियमाने प्रेमाने करावी. तसेच शिष्याची संपूर्ण शरणागती असावी. शरण जाणे म्हणजे:-
संपूर्ण वर्ष ज्या दिवसाची साधक आतुरतेने वाट बघत असतात तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आपल्या गुरूंच्या प्रती असणार प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मठात हाच दिवस गुरुशिष्य दिव्यप्रीती संगम म्हणून साजरा केला जातो.दरवर्षी प्रमाणे यंदाही हा उत्सव अत्यंत उत्साहात मठा मध्ये साजरा करण्यात आला. पुणे, सातारा, सांगली, मुंबई,कोल्हापूर याठिकाणी असलेल्या स्वामी भक्तांनी आवर्जून उपस्थिती लावली.यासोबतच वरुण राजाने सुद्धा आपल्या उपस्थितीने वातावरण मनमोहक केलं.
उत्सवाची सुरुवात ही सकाळी काकड आरती सोबत झाली.त्यानंतर अभिषेक, पूजा व सकाळची आरती झाली.आरती झाल्यानंतर श्री शिवस्वामी समर्थ पूजा करण्यात आली.
बोरणे मठात नामस्मरण सेवेला अनन्यसाधारण असं महत्व आहे.स्वामी अन गुरुमाऊली यांच्या कृपादृष्टी चा अगदी साधा व सोपा उपाय म्हणजे नामस्मरण. शिवसमर्थ पूजा संपन्न झाल्या नंतर सर्व भक्त सामूहिक नामस्मरणात तल्लीन झाले व आपली नामस्मरण रुपी सेवा स्वामी व गुरुमाऊली चरणी अर्पण केली.
नामस्मरण सेवा संपन्न झाल्यावर दुपारची आरती व महाप्रसाद करण्यात आला. सोबतच पौर्णिमेच्या अन्नदाता सेवेकरी यांना अन्नदान सेवेकरिता स्वामी प्रसाद देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यानंतर गुरुमाऊली व माई यांचे पाद्यपूजन करण्यात आले.त्याची सुरुवात प.पु. दादामहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.गुरुमाऊली व गुरुमाई यांच्या पाद्य पूजेनंतर गुरुमाऊली नी सर्व भक्तांना गुरुमाऊली यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष मार्गदर्शन केले.त्यामध्ये त्यांनी गुरू शिष्य परंपरा, अनुग्रह,समर्पण, नामस्मरण करण्याचे फायदे व महत्व यावर मार्गदर्शन केले.गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनानंतर पुण्यातील ज्येष्ठ स्वामी भक्त आबा यांनी आपली गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करत गुरुमाऊली वरील सुंदर अशी कविता बोलून आपली सेवा रुजू केली.
दिवसाच्या अखेरीस पालखी सोहळा व संध्याकाळची महाआरती संपन्न होऊन गुरुशिष्य दिव्यप्रीती संगम सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्याची छायाचित्ररुपी क्षणचित्रे खालील प्रमाणे.
कैलासराणा शिवचंद्र मौळी अशा शिवशंकराची पूजा महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भक्तगण करत असतात. ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्यातील मूळ तत्व म्हणजे भगवान शिवशंकर. शंकराची आराधना या दिवशी मोठ्या श्रद्धेने भक्त करत असतात. श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात शिवतत्त्व होते, भगवान शंकराचे अवतार होते. आज बऱ्यापैकी जिथे जिथे स्वामींचे मंदिर आहे, तिथे तिथे आपल्याला शिवलिंग पहायला मिळते. स्वामी महाराजांनी शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो । हे गिरिजापती भवानीशंकर शिवशंकर शंभो ।। हा मंत्र भक्तांना दिला आणि आज त्यांच्याच आशीर्वादाने व सद्गुरु प.पू. दादा महाराज यांच्या कृपेने गुरुमाऊली इंगवले महाराज यांनी श्री शिवस्वामी समर्थ योग हा सोपा भक्तिमार्ग भक्तांसमोर आणला. सद्गुरु प.पू. दादा महाराज यांनी त्यांच्या अध्यात्मिक कार्याची सुरुवात ज्या ठिकाणाहून केली ते गाव म्हणजे बेलवडे हवेली. गावामध्ये श्री पावकेश्वराचे पुरातन शिवमंदिर आहे. या मंदिराचा प.पू. दादा महाराज यांनी जीर्णोद्धार केला व इथेच त्यांना श्री पावकेश्वराचा कृपाशीर्वाद प्राप्त झाला. या मंदिरातून त्यांनी आपले सेवाकार्य चालू केले. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे खूप मोठा उत्सव प.पू. दादा महाराज यांच्या प्रेरणेने साजरा केला जातो. या उत्सवाला अनेक गावाहून भक्त मंडळी येत असतात येत असतात. प.पू. गुरुमाऊली इंगवले महाराज स्वामीभक्तांना सोबत घेऊन आपल्या गुरूंच्या ठिकाणी म्हणजेच श्री पावकेश्वर मंदिर बेलवडे हवेली येथे दरवर्षी उत्सवाला जात असतात. महाशिवरात्रीला पावकेश्वराचा अभिषेक व पूजा करून, प.पू. दादा महाराज यांचे स्मरण करून, प.पू. दादा महाराज भजनी मंडळाचे भक्तीपुष्प पावकेश्वराच्या तसेच सद्गुरू दादा महाराज यांच्या चरणी अर्पण केले जाते. तिथे भजन सेवा केली जाते. दरवर्षी न चुकता महाशिवरात्रीला तिथे सेवेला जायची संधी प.पू. गुरुमाऊली इंगवले महाराज यांच्या कृपेने भक्तांना मिळते आणि गुरुंसोबत सद्गुरु दर्शन सुद्धा घडते. असा हा भव्य महाशिवरात्री उत्सव प.पू. दादा महाराज यांच्या कृपेने, मोठमोठ्या साधुसंतांच्या सानिध्यात प.पू. दादा महाराज यांचे भक्त एकत्र येऊन साजरा करत असतात.
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नामाचा प्रचार-प्रसार व्हावा, स्वामींची प्रचिती भक्तांना यावी, मुखातून अखंड स्वामी नामस्मरण घडावे म्हणून गेली ६ वर्षे डिसेंबरमध्ये दत्त जयंती नंतर सातारा ते अक्कलकोट पायी वारीचे आयोजन केले जाते. २०१४ साली अवघ्या १० भक्तांना सोबत घेऊन गुरुमाऊली प.पू. इंगवले महाराज यांनी या पायी वारीच्या यात्रेला सुरुवात केली, पण आज या पायी वारीमध्ये प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी एकत्र गोळा होत होत १०० पेक्षा जास्त भक्त सहभागी होत असतात. पायी वारीचा तेरा दिवसांचा हा प्रवास अगदी स्वामीमय वातावरणात पार पडत असतो. श्री स्वामी समर्थ उपासना धाम शाहूपुरी, सातारा येथून वारीचे प्रस्थान होते आणि साताऱ्यातून प्रस्थान केल्यानंतर कोरेगाव, पुसेगाव, गोंदवले, म्हसवड, पिलीव, उपरी, भैरवनाथवाडी, खवणी, पाकणी फाटा, सोलापूर, वळसंग येथे मुक्काम करत वारी अक्कलकोटला पोहोचते. सकाळचा चहा-नाष्टा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण व मुक्काम याची सगळी सोय घरी नसते त्यापेक्षाही सुंदर स्वामीभक्त करत असतात. स्वामीभक्तांची सेवा हीच उच्च स्वामीसेवा हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन भक्तगण प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वामींच्या पादुकांचे स्वागत करत असतात आणि मनोभावे सेवा करत असतात. या वारीमध्ये एक वेगळाच आनंद मुक्कामाच्या ठिकाणी अनुभवायला मिळतो. स्वामीभजन, पूजा, आरती, अभिषेक आणि सोबत गुरूमाऊलींचे वेळोवेळी मार्गदर्शन या गोष्टी वारीत एक नवीन चैतन्य निर्माण करतात. वारीमध्ये चालताना पावलोपावली "श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ" जप करत, अखंड नामस्मरण करत भक्तगण अक्कलकोटच्या दिशेने चालत असतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच स्वामीआनंद असतो, हा आनंद वारी अनुभवल्याशिवाय कळतही नाही. सर्व भक्त एकमेकांची काळजी घेतात, सर्वांमधला परमेश्वर ओळखून रोज दिवसभर चालून रात्री एकमेकांचे पाय दाबतात, काही सेवावेडे भक्त अंघोळीसाठी भल्या पहाटे उठून भक्तांसाठी पाणी गरम करतात मग स्वतः अंघोळ करतात. वाटेवर चालताना गावांमध्ये अनेक लोकांची सुख-दुःख पाहायला मिळतात. जणू स्वामी महाराज स्वतः या भोळ्या लोकांची मदत करण्याची, सेवा करण्याची संधी वारीत देतात. या सगळ्यातून स्वामी महाराज आपल्याला माणुसकीचा धर्म शिकवतात, गरीब लोकांमधला परमेश्वर दाखवतात. वारी सोहळा हा स्वामींचा असला तरी त्यांना ज्याची चिंता असा भक्त ऊन, थंडी, चालून चालून पायाला आलेले फोड याची तमा न बाळगता वारीत अखंड स्वामीनामात चालत राहतो. कारण त्याला जायचे असते ते अक्कलकोटला आणि त्याच्या सोबत असतात साक्षात स्वामीमाऊली...! असं म्हणतात की अक्कलकोटला तेच जातात ज्यांना स्वामी बोलावतात पण पायी वारीत तेच येतात ज्यांना स्वामी स्वतःच्या हाताला धरून अक्कलकोटला नेतात. खरंच या वारीमध्ये पावलोपावली स्वामी त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आपल्या भक्तांना देत असतात, अनेक अनुभव देत असतात, साक्षात स्वामी स्वतः भक्तांसोबत चालत असतात. अकरा दिवस प्रवास करून वारी बाराव्या दिवशी आपल्या स्वामींच्या अक्कलकोटी पोहोचते. अक्कलकोटमध्ये ज्याठिकाणी स्वामी महाराज प्रथम गेले त्या खंडोबा मंदिरात सर्वप्रथम पादुका ठेवल्या जातात आणि आरती व नामस्मरण केले जाते. त्यानंतर स्वामी समाधी मंदिरात दर्शन घेऊन भक्त आपल्या स्वामी आईजवळ भावूक होऊन मोकळे होतात. तिथून वारी थोर स्वामीभक्त बाळप्पा महाराज यांच्या गुरुमंदिरात दुपारच्या विश्रांतीसाठी आणि प्रसादासाठी पोहोचते. गुरू-शिष्य नात्यातील प्रेम या गुरुमंदिरात जाणवते. दुपारी प्रसाद घेतल्यानंतर भक्तगण पादुका घेऊन वटवृक्ष देवस्थान येथील स्वामींच्या मुख्य मंदिरात पोहोचतात. भक्तांची स्वामींच्या दर्शनाची लागलेली ओढ पूर्ण होते. त्यानंतर स्वामींचे दर्शन घेऊन वटवृक्षाखाली स्वामीभजनाची, नामस्मरणाची सेवा स्वामींच्याच कृपेने प.पू. दादा महाराज भजनी मंडळ यांच्यामार्फत स्वामी चरणी अर्पण केली जाते. तो भजनाचा सोहळा म्हणजे एक खूप मोठा उत्सवच असतो. तिथे असणारे सर्व स्वामीभक्त या भजनांमध्ये अगदी तल्लीन होऊन जातात, फुगड्या खेळतात, फेर धरतात. साक्षात स्वामी महाराज स्वतः या नामस्मरणामध्ये गुंग होऊन जातात. ही भजनसेवा झाल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन स्वामींची आरती केली जाते आणि भक्तगण आपले वारीतील अनुभव भक्तांना सांगतात. प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर जणू एक नवचैतन्यच दिसत असते. अनुभवकथन झाल्यावर प्रसाद घेतला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अक्कलकोट मधील स्वामी मंदिरात पादुकांचा अभिषेक करून वारीचे पुन्हा साताऱ्याकडे प्रस्थान होते. असा हा सातारा ते अक्कलकोट पायी वारी सोहळा स्वामीसहवासात पार पडतो. भोळ्या भक्तीचा आणि निष्काम सेवेचा धडा मिळतो तो या वारीतच!
श्री स्वामी समर्थ महाराज व प.पु. दादा महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने "श्रो अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज" यांचा प्रकटदिन सोहळा "श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ , बोरने इथे शुक्रवार १ एप्रिल २०२२ ते रविवार ३ एप्रिल २०२२ असा तीन दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.या तीन दिवसीय सोहळ्यात विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. उत्सव साजरा करण्याचे मठाचे हे यंदाचे १७ वे वर्षे होते. या तीन दिवसीय उत्सवाची सुरुवात ही ३१ मार्च रोजी शाहूपुरी चौक ते बोगदा अशी नगर प्रदक्षिणा करून झाली. सकाळी ९ वाजता सुरु झालेल्या या नगर प्रदक्षिणेचे सातारा शहरातील स्वामी भक्तांनी अत्यंत उत्साहाने स्वागत केले.
उत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही श्रीं ची काकड आरती करून झाली. त्यानंतर श्रीं चा अभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली. सकाळच्या आरती नंतर सर्व स्वामी भक्तांनी नामयज्ञ [सामूहिक नामस्मरण] केला. बोरने मठातील सकाळच्या प्रसन्न वातावरणात चालेल्या या नामयज्ञा दरम्यान स्वर्गीय आनंदाची अनुभूती भक्तांनी अनुभवली.नामयज्ञ पार पडल्यानंतर "श्री स्वामी समर्थ सारामृत" पोथीचे सामूहिक पारायण करण्यात आले. दुपारी महाआरती व महाप्रसाद झाल्यानंतर ह.भ.प. साळुंखे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. संध्याकाळी महाआरती व महाप्रसाद झाल्यानंतर प्रथम दिवसाची सांगता झाली.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पुण्याहवाचन ,कुंडपूजन ,अग्निस्थापना व पीठदेवतापूजन करण्यात आले. संध्याकाळी दादा महाराज भजनी मंडळ यांची भजन सेवा झाली. दादा महाराज भजनी मंडळाची भजन सेवा म्हणजे एक अमृतानुभव असतो. भजनी मंडळातील स्वामी सेवेकऱ्यानी विविध प्रकारची भजन गात संपुर्ण वातावरण भारावून टाकले. संध्याकाळी महाआरती व महाप्रसाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाची सांगता झाली.
उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच प्रकटदिनी स्वामींच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. या निमिताने ओम चैतन्य दिलीपपुरी महाराज व गुरुमाई मनीषाताई पवार यांनी उपस्थिती लावली. यांच्या उपस्थितीत प्राण प्रतिष्ठा झाल्यांनतर महानैवैदय करण्यात आला. महाआरती व महाप्रसाद झाल्यांनतर ह.भ.प. प्रवीण महाराज शेलार, श्री विठ्ठल वारकरी परिवार ,आंबेघर यांचे प्रकटदिन विशेष कीर्तन सेवा झाली. कीर्तन सेवा झाल्यांनतर बोरने गावातील लेझीम पथकाने स्वामी चरणी आपली सेवा रुजू केली. संध्याकाळी श्रींची शाही पालखीतून भव्य पालखी सोहळा झाला. पालखी सोहळ्या सोबतच महाआरती व महाप्रसाद झाला. अखेरीस पसायदान घेऊन या तीन दिवसीय चैतन्य सोहळ्याची सांगता करण्यात आली.
गुरुमाऊली प.पु. विजय महाराज इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली दादा महाराज फौंडेशन पुणे व सातारा येथील स्वामी भक्तांनी या तीन दिवसीय अनुपम्य अशा सोहळ्यात भाग घेऊन स्वामी सेवेचा व गुरु सेवेचा आनंद घेतला. या दिव्य अशा सोहळ्याची ही छायाचित्र रुपी क्षणचित्रे .
आध्यात्मिक उपक्रम
१) श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नामाचा प्रचार, प्रसार आणि अध्यात्मिक मार्गदर्शन :-
' निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू ' असे प. पू. दादा महाराज यांच्या विचारांचा वसा घेऊन संस्थापक प.पू. गुरुमाऊली श्री. विजय इंगवले महाराज यांनी एक आदर्श समाज उभारणीसाठी युवकांना केंद्रस्थानी मानले आहे.
तरूण सक्षम झाला, चांगले विचार घेऊन समाजात उभा राहिला तरच उद्या आपला देश घडणार आहे हे लक्षात घेऊन युवकांना, समाजाला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नामसाधनेचा वसा देऊन योग्य अध्यात्मिक मार्गदर्शन केले जाते. लोकांच्या मनातील देवाबद्दल असलेले गैरसमज, अध्यात्मात अंधश्रद्धेने होणारी फसवणूक दूर करणे व लोकांना परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सत्य आणि शुद्ध स्वरूपाची माहिती पोहोचवणे हे कार्य वैज्ञानिक दृष्टिकोन जपत स्वामीकृपेने केले जात आहे. स्वामी सेवेचा प्रचार करणे व अडचणीत असलेल्या लोकांच्या अडचणींचे निवारण करून, डोळस व आपल्या कर्मावर विश्वास असणारा समाज निर्माण करणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.
श्री स्वामींच्या अध्यात्मिक कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प.पू. दादा महाराजांच्या प्रेरणेने संस्थापक प. पू. गुरुमाऊली श्री विजय इंगवले महाराज यांनी दादा महाराज फौंडेशन आणि प.पू. दादा महाराज भजनी मंडळ यांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रचार, प्रसाराचे सेवाकार्य सुरू केले आहे. विशेषतः फक्त दीनदुबळे, पीडित व संकटात सापडलेल्या लोकांना मदत व मार्गदर्शन वेळोवेळी संस्थेमार्फत केले जात आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नामाचा प्रचार, प्रसार आणि अध्यात्मिक मार्गदर्शन